“तिचा उंबरठा” मध्ये नव्या विचारांच्या स्त्रीचा लढा!

रवी दिवाण निर्मित, प्रदीप घोनसीकर दिग्दर्शित “तिचा उंबरठा” मध्ये नव्या विचारांच्या स्त्रीचा लढा!

स्त्री शिकली प्रगती झाली असे आपण एकीकडे म्हणतो तर दुसरीकडे त्याच स्त्रीला तिच्या अस्तित्वासाठी आणि छोट्याछोट्या गोष्टींसाठी लढायला लावतो. मग देश्याच्या स्वातंत्र्यानंतरच्या ६७ वर्षातली हीच का प्रगती? असा प्रश्न पडतो. आज शहरातील सुशिक्षित स्त्री घराबाहेर विविध क्षेत्रांमध्ये आपले कर्तृत्व सिध्द करण्यात यशस्वी झाली असली तरी संसार म्हटला कि तो बाईचाच असे म्हणत पुरुष मंडळी त्यातून मोकळीक मिळवितात. आणि त्यात नव्या विचारांच्या मंडळींनाही काही विशेष वाटत नाही हेही विशेष म्हणता येईल. साधारण अश्याच विषयाला दिग्दर्शक प्रदीप घोनसीकर यांनी जेष्ठ पत्रकार आणि नाट्य समीक्षक जयंत पवार यांच्या लेखणीतून हात घातला आहे. प्रसिद्ध एक्शन डिरेक्टर रवी दिवाण यांच्या “आरडीएक्स सिनेमा कंपनी” ची निर्मिती असलेल्या “तिचा उंबरठा” या येत्या २६ फेब्रुवारीला येऊ घातलेल्या नव्या चित्रपटात हा विचारांचा संघर्ष पहायला मिळणार आहे.

नाट्य समीक्षक ते नाट्य चित्रपट लेखक असा प्रवास करणारे जेष्ठ पत्रकार जयंत पवार यांच्या “माझ घर” या नाटकाचा आधार घेऊन या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद पवारांनी लिहिले आहेत. स्त्रियांचे प्रश्न अतिशय सध्या सोप्या पद्धतीने हाताळण्याचा हातखंडा असलेले दिग्दर्शक प्रदीप घोनसीकर यांनी हा गहन विषय अतिशय नाजूकतेने पडद्यावर रंगवून त्यातील नाट्य चमकदार आणि रंजक सादर करून एक समतोल साधला आहे. संपूर्ण कुटुंबाला एकत्र खिळवून ठेवणारे प्रसंग या कथेत असल्याने घोनसीकरांनी चित्रपटात त्याचा खुबीने वापर करीत सर्वांना जोडणारा समान धागापकडून चित्रपटाची मांडणी केली आहे. त्यांच्या ‘फोरेनची पाटलीन’ या लोकप्रिय चित्रपटानंतरचा “तिचा उंबरठा” हा दुसरा श्रीप्रधान चित्रपट आहे.

‘तिचा उंबरठा’ मध्ये तेजस्विनी पंडित आणि ज्योती चांदेकर या मायलेकींनी सासू  सुनेच्या भूमिका रंगविल्या आहेत. त्यांच्या या भूमिकांचा विविध पुरस्कार सोहळ्यांमध्ये तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये विशेष गौरव करण्यात आला आहे. ह्या महोत्सवात समीक्षक आणि दर्दी रसिकांनी सर्वांच्या भूमिकांना दाद तर दिली आहेच पण वेगळा विषय निवडल्याबद्दल चित्रपटकर्त्यांचे विशेष कौतुक केले आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत चिन्मय मांडलेकर, सुयश टिळक, हर्षा खांडेपारकर, शीतल शुक्ल, तूलिका निकम, भारत शर्मा, जयंत पाटेकर, अभिनय पाटेकर, अदिती सावंत(बालकलाकार), इत्यादी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. डीओपी योगेश जानी यांनी ‘तिचा उंबरठा’चे चित्रीकरण केले असून प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी या चित्रपटासाठी कलादिग्दर्शन केले आहे. वेशभूषा पूर्णिमा ओक यांची असून संकलन प्रशांत खेडेकर यांनी केले आहे तर ध्वनी संयोजन विजय भोपे यांचे आहे. संगीतकार श्रेयश प्रीत यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांना आपला जादुई स्वर प्रसिद्ध गायिका कविता सेठ, पॉप स्टार जसराज जोशी, अक्षता सावंत, सुहास सावंत, मंदार आपटे यांनी दिला आहे तर मुकेश यांनी कार्यकारी निर्मिती केली आहे. निर्मिती संयोजन सहाय्य सुर्यकांत कोटांबे यांनी केले आहे.


Photo Gallery :


 

 

Loading...
SHARE