झी टॉकीजवर उलगडणार ‘सैराट’ची यशोगाथा

sairat-success-secrete

झी टॉकीजवर उलगडणार सैराटची यशोगाथा

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीत ‘माईलस्टोन’ ठरला. चार महिन्यांपुर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या देशाला ‘याड’ लावलं, अजूनही या चित्रपटाची ‘झिंग’ उतरलेली दिसत नाही. बॉक्स ऑफिसवरचे सर्व रेकॉर्ड मोडत या सिनेमाने मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास घडवला. सैराटला मिळालेल्या या प्रचंड प्रतिसादाची यशोगाथा रविवार १८ सप्टेंबरला दुपारी १२.३० वा. व सायंकाळी ७.०० वा. झी टॉकीजवर उलगडली जाणार आहे. सैराट मिळालेला तुफान प्रतिसाद संग्रहित करण्यासाठी व मिळालेल्या अभूतपूर्व यशाला सलाम करण्याकरिता सैराटची यशोगाथा चित्रीत करण्यात आली.

सैराटच्या टीमने नुकतीच दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या जेऊर या गावी भेट दिली. चित्रपटाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादाप्रमाणे जेऊरच्या गावकऱ्यांनी सैराट टीमचं तितकंच उत्सुफुर्त व दमदार स्वागत केलं. यावेळी सैराट टीमने चित्रपटाचा आतापर्यंतचा प्रवास व अनुभव कथन करत सैराटचं यश आगळ्या पद्धतीने साजरं केलं. ५०,००० प्रेक्षकांचा प्रतिसाद अपेक्षित असताना १,५०,००० हून अधिक रसिकांचा प्रतिसाद याला लाभलाय.

या यशोगाथेमध्ये सैराटच्या कलाकार तंत्रज्ञांचा अनुभव, पडद्यामागचे धमाल किस्से यांचा समावेश असून रविवार १८ सप्टेंबरला दुपारी १२.३० वा. व सायं ७.०० वा. झी टॉकीजवर सैराटची ही यशोगाथा प्रेक्षकांना पहाता येईल.  महेश मांजरेकर, नागराज मंजुळे, नितीन केणी, निखिल साने, अजय- अतुल गोगावले, रवी जाधव, संजय जाधव, रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, तानाजी गालगुंडे, अरबाज शेख, सादिक चितळीकर आदि मान्यवरांनी सैराटच्या यशाविषयी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. ग्रामीण बाजाची प्रेमकथा, नवे चेहरे आणि धमाकेदार संगीत याच्या सुंदर मिलाफातून प्रचंड यशस्वी ठरलेली ही ‘भन्नाट प्रेमाची सैराट गोष्ट’ मराठी प्रेक्षकांच्या मनावर नक्कीच दीर्घकाळ अधिराज्य करेल.


 

Loading...
SHARE