‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चार दिवसात 6 कोटींची बंपर कमाई

प्रविण विठ्ठल तरडे लिखित, दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या मराठी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर बंपर, खतरनाक ओपनिंग मिळाले आहे. 23 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार या चार दिवसात बॉक्स ऑफिसवर सुमारे 6 कोटीची बंपर कमाई केली आहे.

काल्पनिक कथेवर आधारीत, वास्तवाच्या जवळ जाणाऱ्या या चित्रपटाला मल्टिप्लेक्ससह सिंगल स्क्रीन चित्रपटगृहातसुद्धा प्रेक्षकांची तुफान गर्दी होत आहे. मल्टीप्लेक्स मध्ये ‘मुळशी पॅटर्न’ चा पहिला शो सकाळी 8.30 वा. तर शेवटचा शो रात्री 11.50 वा. होत असून चित्रपटाला ग्रामीण भागातही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तर चित्रपटाने सर्वाधिक कमाई पुणे शहर आणि जिल्ह्यातून केली आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्याचे खेड्यापाड्यातील प्रेक्षक जिप व इतर वाहनांनी जवळच्या चित्रपटगृहात येत आहेत, मोठ्या शहरात मल्टीप्लेक्स मध्ये तिकिटाचे दर वाढले आहेत, 50 रुपयांपासून 600 रुपयांपर्यंत  ‘मुळशी पॅटर्न’ च्या तिकिटाचे दर आहेत, तरीही प्रेक्षकांची गर्दी कायम असल्याचे दिसते. यामध्ये दोन – तीन वेळा चित्रपट पहाणाऱ्या प्रेक्षकांची संख्याही मोठी आहे. चित्रपटाची कथा, सादरीकरण, कलाकारांचा अभिनय, चित्रीकरण उत्तम असल्याची प्रतिक्रिया प्रेक्षक देत आहेत.

‘मुळशी पॅटर्न’ ला संपूर्ण महाराष्ट्रात मिळत असलेल्या तुफान प्रतिसादाबद्दल बोलताना अभिनेता, लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे म्हणाले, ‘’चित्रपटाचा विषय मातीतला आहे, यामुळे तो प्रेक्षकांना आवडेल असा मला विश्वास होता. चित्रपटगृहातून प्रेक्षक सुन्न होउन बाहेर येत आहेत, हेच आमच्या टीमचे यश आहे. महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी गेल्या तीन आठवड्यात तीन चित्रपटांना भरभरून प्रतिसाद दिला आहे, यातील दोन चित्रपटांच्या मागे मोठ्या स्टुडीओचे पाठबळ होते, आम्ही त्यांच्या तुलनेत कुठेच नव्हतो तरीही प्रेक्षकांनी आमच्या उत्तम कलाकृतीला दाद दिली याबद्दल मी प्रेक्षकांचे आभार मानतो.’’

Loading...
SHARE