शिक्षणाचे महत्व सांगणार ‘क्षितिज’

kshitij-marathi-movie-trailer-and-promo-song-launch
शिक्षणाचे महत्व सांगणार ‘क्षितिज’ 
सामाजिक घटनांचा आणि समस्यांचा उहापोह मांडण्याचे प्रभावी माध्यम म्हणजेच सिनेमा. जनसामान्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या काही सामाजिक गोष्टींचा वेध घेण्यासाठी सिनेमा नेहमीच महत्वाची भूमिका बजावत असतो. त्यामुळे आपले मत परखड मांडण्यासाठी आणि काही सामाजिक संदेश देण्यासाठी या माध्यमाचा सर्रास उपयोग केला जातो. सामाजिक बांधिलकी जपू इच्छिणाऱ्या अशाच काही संवेदनशील व्यक्तींद्वारे ‘क्षितिज’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर सादर होत आहे. मीडिया फिल्म्स क्राफ्ट कंपनी (यू.एस) आणि नवरोज प्रसला प्रोडक्शन्सचे नवरोज प्रसला निर्मित तसेच करिष्मा म्हाडोलकर यांची सहनिर्मिती असलेल्या  ‘क्षितिज’ या वास्तववादी सिनेमाचे दिग्दर्शन मनौज कदम यांनी केले आहे. शिक्षणाचे महत्व सांगणारा हा सिनेमा प्रेक्षकांना मनोरंजनासोबतच सामाजिक मूल्यांचा देखील संदेश देणार आहे. अभिनय नव्हे तर आपल्या अभिनयातून सामाजिक शिकवण देणारा कुशाग्र अभिनेता उपेंद्र लिमये यात प्रमुख भूमिकेत असणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे गोरेगाव येथील वेस्टीन हॉटेलमध्ये ट्रेलर आणि प्रमोशनल सॉंग लॉंच करण्यात आले. .
‘क्षितिज’ या सिनेमातील सर्व कलाकारांच्या उपस्थितीत सादर झालेल्या या सिनेमाच्या ट्रेलर आणि प्रमोशनल सॉंगला उपस्थितांचा भरघोस प्रतिसाद लाभला. आजही खेड्यापाड्यात अनेक मुले शिक्षणापासून वंचित आहे. प्रतिकूल परिस्थितींमुळे शिक्षण घेण्यास उत्सुक असूनही शिक्षणापासून वंचित राहिलेली अनेक मुले- मुली आपणास पाहायला मिळतात. अशा या मुलांच्या मानसिकतेचा परिमाण मांडण्याचा प्रयत्न ‘क्षितिज’ या चित्रपटामधून केला आहे. या सिनेमाचे प्रमोशनल सॉंग गुरु ठाकूर यांनी लिहिले असून या गाण्याला शैलेंद्र बर्वे यांचे संगीत लाभले आहे, लहान मुलांवर आधारित असलेले हे गाणे सागर म्हाडोलकर यांनी कोरियोग्राफ केले आहे. शाळकरी मुलांचे भावविश्व मांडणाऱ्या या गाण्याचे सिनेमाची प्रमुख बालकलाकार वैष्णवी तांगडे आणि काही लहान मुलांनी मिळून या  कार्यक्रमादरम्यान सादरीकरण केले.
शिक्षणाचा सामाजिक संदेश जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही ‘क्षितिज’ सिनेमाची निर्मिती करण्याचा विचार केला असल्याचे सिनेमाचे निर्माते नवरोज प्रसला यांनी यावेळी सांगितले. तर या सिनेमाबद्दल बोलताना अभिनेता उपेंद्र लिमये यांनी सांगितले की, हा सिनेमा वास्तववादी जीवनावर आधारित असून, समाजातील प्रतिकूल परिस्थितीला मात करत शिक्षणासाठी एका सामान्य मुलीने केलेला संघर्ष यात असल्याचे उपेंद्र लिमये यांनी सांगितले. या सिनेमात उपेंद्र सोबतच वैष्णवी तांगडे ही बालकलाकार प्रमुख भूमिकेत असणार आहे.
प्रोफेसर रेबन देवांगे लिखित या सिनेमाचे नीरज वोरलीया यांनी संकलन केले आहे. तसेच योगेश राजगुरू यांच्या केमेऱ्यात चित्रित झालेल्या या सिनेमाचे ध्वनीमुद्रण रसूल पुकुट्टी यांनी केले आहे, विशेष म्हणजे या सिनेमाचे ध्वनिमुद्रण करताना रसूल यांनी कोणत्याही तांत्रिक गोष्टीचा वापर न करता नैसर्गिक आवाजांचा वापर यात केलेला आहे.
या सिनेमात मनोज जोशी, विद्याधर जोशी, संजय मोने, कांचन जाधव, राजकुमार तांगडे, प्रकाश धोत्रे अशा दिग्गज कलाकारांची फळी पाहायला मिळणार असून, अर्णव मंद्रुपकर आणि आकांक्षा पिंगळे हे बालकलाकार देखील आहेत.  समाजातील तळागाळातील लोकांच्या जीवनावर हा सिनेमा थेट भाष्य करणारा असून हा सिनेमा भविष्यात अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरेल, अशी आशा सिनेमाच्या टीमला वाटते.

Loading...
SHARE