‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव – क्षितीश दाते

‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा मला समृद्ध करणारा अनुभव – क्षितीश दाते

गेल्या ८ वर्षांपासून रंगभूमीवर अभिनय आणि दिग्दर्शनाचा अनुभव असलेला क्षितीश दाते आगामी बहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत क्षितीशने सर्वोत्कृष्ट अभिनयासाठीचे नटवर्य केशावारात दाते, दिग्दर्शनाचे गणपतराव बोडस पारितोषिक पटकावलेले आहे. तसेच योगेश सोमण दिग्दर्शित ‘माझ भिरभिर’ या चित्रपटातून तो चमकला आहे, तर ‘देवा शप्पथ’ या मालिकेत मुख्य भूमिकेत होता. अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन असलेला ‘मुळशी पॅटर्न’हा चित्रपट येत्या शुक्रवारी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

‘मुळशी पॅटर्न’ विषयी बोलताना क्षितीश दाते म्हणाला की, “दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मला एक मोठी भूमिका आहे पण तुझ्यापठडी पेक्षा थोडी वेगळी आहे.करशील का? अशी विचारणा केली.प्रवीण तरडे यांचे यापूर्वीचे चित्रपट, नाटकं, एकांकिका मी बघितल्या होत्या. त्यामुळे एक कलाकार म्हणून प्रवीण तरडे यांच्यासोबत काम करणे ही सुवर्णसंधी स्वतःहून माझ्याकडे चालून आली होती. त्यामुळे मी क्षणाचाही विलंब न करता लगेच होकार दिला.’’

चित्रपटाचे शुटिंग साधारण ४० दिवस सुरू होते. यात माझे सर्वाधिक सीन्स हे ओम भूतकर बरोबर आहेत. ओम आणि मी जुने मित्र. आम्ही एका नाटकात एकत्र काम सुद्धा केले आहे. ‘मुळशी पॅटर्न’मध्ये मी त्याच्या एकदम जिगरी मित्राची भूमिका बजावत आहे. आमची मैत्रीच मुळात अतिशय चांगली असल्याने पडद्यावर पण आमच्यातील केमेस्ट्री खुलून दिसते. या चित्रपटात काम करताना मला बरीच तयारी करावी लागली, त्यात प्रामुख्याने मी काम केले ते माझ्या भाषेवर. माझी भाषा मुळात फार सौम्य आहे. त्यामुळे ग्रामीण भागात बोलली जाणारी भाषा आणि तिचा लेहजा मी अंगिकारला. त्यातून मला माझा अभिनय करणे अधिक सुकर गेले.

‘मुळशी पॅटर्न’च्या निमित्ताने मला अनेक दिग्गज कलाकारांसोबतकाम करण्याची संधी मिळाली. मोहन जोशी, उपेंद्र लिमये यांची अभिनयाची बैठक, बारकावे, कामाच्या बाबतीत फोकस्ड असणे अशा अनेक गोष्टी मला शिकायला मिळाल्या.‘मुळशी पॅटर्न’ मध्ये काम करणे हा माझ्यासाठी खरंच खूप समृद्ध करणारा अनुभव होता”

चित्रपटाच्या विषयाबद्दल बोलताना क्षितीश म्हणाला, शेती हा विषय माझ्या जवळचा नसला तरी त्यातील समस्या किमान माहिती आहेत. तसेंच आपल्या शहरांमध्ये काय घडतंय, शहरे आकारहीन कशी काय बनत चालली आहेत या विषयी आपण नेहमी बोलतो यामुळे त्या बद्दल थोडीफार माहिती होती, शुटींग सुरु करण्यापूर्वीप्रवीणतरडे यांनी विषयाची पूर्वकल्पना दिल्याने मला अधिक चांगले काम करता आले. मला वाटते हा चित्रपट केवळ एक करमणुकीचा भाग नसून काळाची गरज लक्षात घेऊनबनवलेली एक कलाकृती आहे. दरम्यान, ‘मुळशी पॅटर्न’ नंतर महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘भाई – व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटासह एका नाटकातून आणि ऑडीओ बुक मधूनही प्रेक्षकांना भेटायला येणार असल्याचे क्षितीशने सांगितले.

Loading...
SHARE