‘दमलेल्या बाबाची कहाणी’!!

Damlelya Babachi Kahani Marathi Movie

‘दमलेल्या बाबाची कहाणी’!!

विशाल धनवडे आणि ‘पालवी क्रिएशन्स’ चा ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ हा सामाजिक-कौटुंबिक चित्रपट २४ जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. कथा, पटकथा आणि संवाद, नितीन चव्हाण ह्यांनी लिहिले असून ते ह्या चित्रपटाचे सह-निर्माता देखील आहेत. नितीन चव्हाण आणि योगेश जाधव ह्याचं दिग्दर्शन असून डॉ सलील कुलकर्णी ह्यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. तर चित्रपटाचं छायाचित्रण मयुरेश जोशी ह्यांनी केलं आहे .
एका गाण्यावरून चित्रपट बनविण्याची आणि त्या गाण्याच्या गीतकारानेच त्या चित्रपटातील प्रमुख भूमिका करण्याची, सिनेसृष्टीतील ही पहिलीच घटना आहे. संदीप, कवितेशी जसा तद्रूप होतो तसाच ह्या चित्रपटातील बाबाच्या भूमिकेशी सुद्धा इतका तद्रूप झालाय की फिचर फिल्म च्या कॅमेराला प्रथमच सामोरं जाण्याचं संदिपचं ‘नवखेपण’ कुठेही जाणवत नाही. एकाच चित्रपटात कवी संदीप खरे आणि कवी किशोर कदम ह्या दोन सिद्धहस्त कवींचा अभिनयही आपल्याला पाहायला मिळणार आहे. शिवाय गुणी अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिनं, चित्रपटातील मुलीची भूमिका अतिशय प्रभावीपणे साकारली आहे. संदीपने साकारलेला दमलेला बाबा आणि संस्कृतीनं केलेल्या मुलीच्या भूमिकेतील अभिनय इतका सुंदर झालाय कि बाबा आणि मुलीमधील नात्याचं वास्तववादी चित्रण आपल्याला ह्या चित्रपटात पहायला मिळणार आहे. प्रवीण तरडे, अस्ताद काळे, दीप्ती भागवत, ज्योती चांदेकर, किशोर चौगुले आणि बालकलाकार श्रेया पासलकर इत्यादी कलाकारांनी देखील आपापल्या भूमिकेला योग्य तो न्याय दिला आहे.
ह्या चित्रपटात समाजाची मानसिकता आणि कुटुंब व्यवस्था ह्यांची सांगड इतक्या बेमालूमपणे घातली आहे की हा चित्रपट एक ‘सामाजिक-कौटुंबिक’ चित्रपटाचं उत्तम उदाहरण म्हणावं लागेल !  स्त्रियांवरील अत्याचार हि समाजाला लागलेली कीड आहे. समाजाच्या ह्या मानसिकते विरुद्ध, एका मुलीचा हळुवार मनाचा बाबा कसं तोंड देतो आणि हे करत असतांनाच, आपलं आणि आपल्या मुलीमधील हळुवार नातंही तो कसं जपत असतो हे अतिशय सुंदररित्या नितीन चव्हाण ह्यांच्या कथेतून आणि संवादातून आपल्याला ‘दमलेल्या बाबाची कहाणी’ ह्या चित्रपटात दिसणार आहे.
२४ जूनला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होत असून जुलै महिन्यात अमेरिकेत देखील ह्या चित्रपटाचे शो करण्याचे नियोजन चालू आहे. प्रदर्शनापूर्वीच ह्या चित्रपटाने यशाच्या पायऱ्या चढायला देखील सुरुवात केली आहे ! नाशिक आणि गोवा मराठी चित्रपट महोत्सवामध्ये ह्या चित्रपटाच्या प्रदर्शनाला, प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला असून, आवर्जून बघावे अश्या चित्रपटांच्या यादीत हा चित्रपट जाऊन बसला आहे.
शिवाय ‘ह्या समाजाचं मी काहीतरी देणं लागतो’ ही सामाजिक जाण असलेल्या निर्माता विशाल धनवडे ह्यांनी समाजासाठी बनवलेल्या ह्या चित्रपटातून जे उत्पन्न येईल त्या उत्पन्नातून, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी मदत जाहीर केली आहे .

Read This Article In English —-> Click Here


Loading...
SHARE