मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अंकित चंदिरमानी यांचा प्रस्तुतकर्ता म्हणून प्रवेश

Sunshine Studio's 'Ankit Chandiramani' steps into Marathi cinema!

बबन, हंपी, शेंटिमेंटल अशा अनेक मराठी चित्रपटांसह भारतातली पहिली स्पेस फिल्म टिक टिक टिक, ऑस्करप्राप्त संगीतकार ए. आर. रेहमान यांचा वन हार्ट हा म्युझिक कॉन्सर्ट नावावर असलेल्या सनशाईन स्टुडिओजच्या अंकित चंदिरमानी यांनी मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आहे. प्रस्तुतकर्ता या नव्या भूमिकेतून अंकित चंदिरमानी “स्माइल प्लीज” हा चित्रपट घेऊन येत आहेत.

“सनशाईन स्टुडिओज “स्माईल प्लीज”चे प्रस्तुतकर्ते!! चित्रपट वितरण क्षेत्रात अंकित चंदिरमानी हे मोठं नाव आहे. रजत एंटरप्रायझेस, दार मोशन पिक्चर्स, झी स्टुडिओज अशा मातब्बर कंपन्यांसह काम केल्यानंतर दोन वर्षांपूर्वी त्यांनी “सनशाईन स्टुडिओज”ची स्थापना केली. गेल्या दोन वर्षांत त्यांनी ८० हून अधिक चित्रपटांसाठी वितरक म्हणून काम केलं आहे. तर अंकित यांना ७०० हून अधिक चित्रपटांसाठी काम करण्याचा अनुभव आहे. त्यांनी डार्क नाइट रायझेस, जज्बा, फास्ट ६ अशा अनेक हॉलिवूडपटांसाठीही काम केलं आहे. तर मराठी चित्रपटांचे ते आघाडीचे वितरक आहेत. “मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश करताना अत्यंत आनंद होत आहे. मराठी चित्रपटसृष्टीने गेल्या काही वर्षांत लक्षणीय कामगिरी केली आहे. “स्माइल प्लीज” या चित्रपटाची प्रस्तुती आम्ही करत आहोत. अनेक दिवसांपासून आम्ही चांगल्या कथेच्या शोधात होतो. “हृदयांतर” या कौतुक झालेल्या चित्रपटानंतर प्रख्यात फॅशन डिझायनर विक्रम फडणीस यांनी “स्माइल प्लीज” या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.”स्माइल प्लीज” हा अतिशय उत्तम चित्रपट आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे, अभिनेता ललित प्रभाकर ही उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात असून चित्रपटाचा विषयही मनाला भिडणारा असा आहे त्यामुळे तो प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी अपेक्षा आहे”, अशी भावना अंकित चंदिरमानी यांनी व्यक्त केली.

येत्या १९ जुलैला “स्माइल प्लीज” चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.


 

Loading...
SHARE