वय विसरायला लावणारी जगावेगळी प्रेम कहाणी घेऊन झी मराठी वाहिनी ‘तुला पाहते रे’ ही वेगळ्या धाटणीची मालिका १३ ऑगस्ट पासून प्रेक्षकांसाठी सादर करत आहे. ‘तुला पाहते रे’ या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे आता पुन्हा एकदा ‘झी मराठी’ वाहिनीवर पुनरागमन करत छोट्या पडद्यावर आपली जादू दाखवणार आहे. तर सुबोध सोबत गायत्री दातार ही नवोदित अभिनेत्री या मालिकेतून पदार्पण करत आहे. तिच्या पदार्पणाविषयी गायत्रीसोबत साधलेला हा खास संवाद –
१. पहिलीच मालिका, झी मराठी सारखी वाहिनी आणि पदार्पणातच सुबोध भावे सोबत काम करण्यासाठी संधी, या सगळ्याबद्दल एकंदरीतच काय सांगशील?
पदार्पणातच मला सुबोध भावे सारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी झी मराठी या वाहिनीने दिल्याबद्दल मला खूप आनंद आहे आणि मी संपूर्ण टीमची त्यासाठी मनापासून आभारी आहे. ‘प्रेम विसरायला लावणारी जगावेगळी प्रेमकथा’ म्हणजे तुला पाहते रे ही मालिका आणि या मालिकेची संकल्पना खूप वेगळी आहे. मी अभिनय क्षेत्रात यायचं ठरवल्यानंतर झी मराठीच्या एका वेगळ्या धाटणीच्या मालिकेचा मी एक महत्वाचा भाग आहे याचा मला आनंद आहे.
२. तुझ्या पात्राविषयी थोडक्यात सांग
मी इशा निमकर या मुलीची व्यक्तिरेखा साकारतेय. इशा ही एका मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेली आहे. तिच्या बाबांची लाडकी. जास्त हुशार नाही किंवा ढ देखील नाही. पण उराशी खूप स्वप्न बाळगलेली आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत घेणारी अशी मुलगी आहे. तिच्या बाबांचा स्वभाव खूप देवभोळा आहे आणि त्यामुळेच ती तिच्या बाबांच्या खूप जवळ आहे.
३. सुबोध भावे सारख्या कलाकारांसोबत काम करताना काही दर्पण आलं का?
सुबोध भावे सारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करताना सुरवातीला थोडं दडपण नक्कीच होतं. पण ते एक कलाकार म्हणून आणि एक मानून म्हणून देखील खूप उत्तम आहेत. या क्षेत्रात जरी मी नवीन असली तरी त्यांनी पावलोपावली मला मार्गदर्शन केलं. शूटिंगच्या दरम्यान देखील त्यांच्या कडून मला बरंच काही शिकायला मिळतं. त्यांच्या अभिनयातील बारकावे आणि त्यांचा अनुभव यातून मी खूप काही शिकत आहे. त्यामुळे आता दडपण नसून त्यांच्याकडून जितकं काही शिकता येईल तितकं शिकण्याचा मी प्रयत्न करतेय.
४. सेटवरील एकंदर वातावरण कसं असतं?
सेटवरील वातावरण खूप उत्तम आहे. मी मालिका क्षेत्रात नवीन असल्यामुळे मला सेट वरील प्रत्येक व्यक्ती मग ते माझे डिरेक्टर, डीओपी असोत किंवा माझे सहकलाकार असो, प्रत्येकाने मला त्यांच्या परीने सपोर्ट केला आहे. मला एखादी गोष्ट कळली नाही तर त्यांनी संयम ठेवून मला गोष्टी समजावल्या. माझा नुकताच वाढदिवस झाला आणि त्यादिवशी शूट नव्हतं पण त्यानंतर जेव्हा शूटिंग होतं तेव्हा सर्वांनी मिळून माझा वाढदिवस सेटवर साजरा केला आणि हा अनुभव खूप छान होता.
५. सर्व सहकलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव कसा आहे?
या मालिकेतील माझे सर्व सहकलाकार नामवंत कलाकार आहेत. पण त्यांनी कधीच मला नवखी म्हणून डिवचलं नाही उलट त्यांनी मला सपोर्ट केला आणि माझा परफॉर्मन्स अधिकाधिक उत्तम कसा होईल यासाठी मला मदत केली.