मोरपंखी प्रेमकहाणीला रहस्याची किनार “सख्या रे” कलर्स मराठीवर !

Sakhya Re Colors Marathi Serial from 9 January

९ जानेवारीपासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता फक्त कलर्स मराठीवर   

‘एका पहाटेची दोनं स्वप्न … एक पूर्ण तर एक अपूर्ण’ या कथासूत्रावर आधारित नवीन मालिका ‘सख्या रे’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे फक्त कलर्स मराठीवर ९ जानेवारीपासून सोम ते शनि रात्री ९ वा.   ब्लू वेल मिडीया निर्मित आणि चिन्मय मांडलेकर लिखित ‘सख्या रे’ ही मालिका प्रेक्षकांशी एक आगळं वेगळं नातं जोडेल यात शंका नाही. ‘सख्या रे’ मालिकेत प्रेक्षकांचं अपार प्रेम लाभलेला त्यांचा लाडका अभिनेता सुयश टिळक, रुची सवर्ण आणि निवोदित ज्ञानदा रामतीर्थकर यांच्यासह ज्येष्ठ अभिनेत्री रोहीणी हट्टंगडी हे प्रमुख भूमिकेत दिसतील. या खेरीज ‘सख्या रे’ मध्ये अजय पुरकर, मीना नाईक, विवेक आपटे, अश्विनी कुलकर्णी, राहुल मेहेंदळे यांच्याही प्रमुख भूमिका असतील.

पती आणि पत्नी म्हणजे संसाररथाची दोन चाकं, या आणि अशा आशयाच्या अनेक ओळी आपण याआधी वाचल्या असतील, प्रसंगी अनुभवल्या असतील, पण याच संसाररथाच्या एका चाकाने दुसऱ्या चाकाला राजीखुशीने बाजूला व्हायला आणि अडथळणाऱ्या दुसऱ्या एका रथाला सावरायला सांगितलं तर? वैदेही आणि समीर नव्यानेच प्रेमात पडलेलं जोडपं. लवकरच साताजन्माच्या साथीचं वचन देऊन सहजीवनाला सुरुवात करायची हे त्यांचं स्वप्न. ठरल्याप्रमाणे गोष्टी घडतात देखील, दोघांचं लग्न ठरतं आणि मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन दोघे नव्या आयुष्याला सुरुवात करायचं ठरवतात, अगदी संसाररथाच्या दोन चाकांची जबाबदारी घेतल्यासारखी ! पण सुरळीत चालणाऱ्या या रथाला खीळ बसते एका अपरिचित वळणावर, वैदेही आणि समीरसमोर उभा ठाकतो, एक अनोळखी भूतकाळ…

 

अनेक दिवस वैदेही आणि समीरच्या पाळतीवर असलेली प्रियंवदा एका अपघाताने त्यांच्यासमोर येते आणि काळाची चक्रं उलटी फिरतात. गेलेली वेळ परत येत नाही, पण नियतीच्या या खेळात घड्याळ्याचे काटे खरंच उलटे फिरतात आणि प्रियंवदाचा भूतकाळ उलगडू लागतो. प्रेम आणि विश्वासाभोवती निर्माण होणारं संशयाचं वलय आणि त्यातून रंगत जाणा-या नात्यांच्या संघर्षाचा प्रवास म्हणजे कलर्स मराठीवरील ‘सख्या रे’ ही मालिका.

या मालिकेच्या निमित्ताने कलर्स मराठी प्रमुख, व्हायाकॉम -18 चे अनुज पोद्दार म्हणाले की,’कलर्स मराठीने नेहमीच प्रेक्षकांसाठी जीवनातील विविध कंगोरे दाखवणा-या मालिका आणल्या. प्रत्येक मालिका आणि कार्यक्रमाला रसिकांनी उदंड प्रतिसाद आणि भरभरून प्रेम देखील दिलं. मग ती ‘गणपती बाप्पा मोरया’सारखी पौराणिक मालिका असो, ‘अस्सं सासर सुरेख बाई’सारखी कौटुंबिक मालिका असो किंवा ‘कोण होईल मराठी करोडपती’सारखा कार्यक्रम असो ज्यांना प्रेक्षकांनी अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन पोहचवले. या कार्यक्रमांना मिळत असलेला प्रतिसाद म्हणजे प्रेक्षकांनी आम्हाला दिलेली पसंतीची पावती आहे. ‘सख्या रे’ ही मालिका देखील प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, अशी आमची खात्री आहे.

एका आनंदी कुटुंबात फुलत जाणाऱ्या मोरपंखी प्रेमकथेला असलेली रहस्याची किनार, हे ‘सख्या रे’ मालिकेचं वैशिष्ट्य आहे. तेव्हा बघायला विसरू नका ‘सख्या रे’ ९ जानेवारीपासून सोम ते शनि रात्री ९ वा. फक्त कलर्स मराठीवर.

 


 

Loading...
SHARE