गणवेशचा टीझर प्रदर्शित!

Ganvesh Marathi Movie Poster

गणवेशचा टीझर प्रदर्शित!

गणवेश या आगळ्यावेगळ्या चित्रपटाचा खरा गणवेश (टीझर) सर्वांसाठी प्रदर्शित करण्यात आला. नुकताच या चित्रपटाच्या कलावंतांपैकी मुक्ता बर्वे, किशोर कदम, स्मिता तांबे, दिग्दर्शक अतुल जगदाळे यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या राष्ट्रीय सावरकर स्मारक येथील पुतळ्याला वंदन करून हा टीझर प्रकाशित झाल्याचे जाहीर केले.

आपल्या देशाचे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांसह देशातील कित्येक सामान्य नागरिकांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन हे स्वातंत्र्य मिळविले आहे. याचा आपल्या आजच्या पिढीला विसर पडता कामा नये, म्हणून या चित्रपटाचा घाट घातल्याचे निर्माते – दिग्दर्शक कॅमेरामन अतुल जगदाळे यांनी व्यक्त केले. तर उत्तम कलाकृती, भरपेट मनोरंजन आणि काहीसं आजच्या सर्व सामान्य माणसांच्या जगण्याच्या परिस्थीतीचं मिश्रण म्हणजेच “गणवेश”. हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीला येतोय, त्याची गम्मत अनुभवण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात येतील असा विश्वास किशोर कदम, मुक्ता बर्वे आणि स्मिता तांबे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

भारताला स्वातंत्र्य मिळून ६६ वर्षे पुर्ण झाली. आज जगात भारत एक जागतिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे असं म्हटलं जातं. स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या देशाने फार प्रगती केली ही झाली एक बाजू. दुसऱ्या बाजूला आहेत बेकारी, गरिबी, भ्रष्टाचार, महागाई अशा एक ना अनेक समस्या. आजही एखादा गरिब भारतीय माणूस त्याची अगदी किरकोळ गरज भागवायची असलीतरी हतबल होतो. शेपाचशे रूपये त्याला एखाद्या डोंगरासारखे वाटू लागतात. स्वातंत्र्यानंतर प्रत्येक भारतीयाला वाटत होते की लुबाडणारे इंग्रज गेले आता आपल्या सगळ्या समस्या दूर होणार, आपण सुखी होणार. पण तसे झाले का? याची सर्व उत्तरे आपल्याला ‘गणवेश’च्या प्रवासात उलगडत जाणार आहेत. या चित्रपटाची मांडणी अगदी साधी सरळ आणि मार्मिक असल्याने प्रेक्षकांच्या मनावर परिणाम करणारी आहे.

Ganvesh Marathi Movie‘विजयते एन्टरटेन्मेंट’ या संस्थेने ‘गणवेश’ची निर्मिती केली आहे. प्रसिद्ध कॅमेरामन अतुल जगदाळे निर्मिती दिग्दर्शनात ‘गणवेश’सोबत पदार्पण करीत आहेत. या चित्रपटाचे कथा पटकथा आणि संवाद तेजस घाटगे यांनी लिहिले असून लोकप्रिय गीतकार गुरु ठाकूर यांच्या गीतांना संगीतकार निहार शेंबेकर यांनी संगीत दिले आहे.’ गणवेश’ला आघाडीचे गायक नंदेश उमप आणि उर्मिला धनगर यांनी स्वरसाज चढवला आहे, तर पार्श्वसंगीत मंगेश धाकडे यांचे आहे. कलादिग्दर्शन ज्ञानदेव इंदुलकर यांनी केले असून वेशभूषा स्मिता कोळी तर रंगभूषा ललित कुलकर्णी यांनी केली आहे. साउंड डिझाईन मनीष यांचे असून अॅक्शन हरपाल सिंघ, रवी कुमार यांनी तर संकलनाची किमया राजेश राव साधली आहे. कार्यकारी निर्मिती राजेंद्र विश्वनाथ कुलकर्णी, शैलेंद्र घडे यांनी पाहिली आहे, निर्मिती व्यवस्थापन राजू झेंडे यांनी केले असून नृत्य दिग्दर्शन कार्थिक पाल यांनी नृत्यावर ताल धरायला लावले आहे. ‘गणवेश’साठी रवी उंडाळे यांनी मुख्य सहाय्यक दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत किशोर कदम, मुक्ता बर्वे, दिलीप प्रभावळकर, स्मिता तांबे, गुरु ठाकूर, नागेश भोसले, सुहास पळशीकर, गणेश यादव, शरद पोंक्षे, जयंत सावरकर, बाळकृष्ण शिंदे, अरुण गीते, अशोक पावडे, प्रफुल कांबळी, विजया पालव आणि बालकलाकार तन्मय मांडे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.


 

Loading...
SHARE