ट्रेनमधून कुठे जातात ट्रक? तुम्हाला कधी पडलाय का हा प्रश्न?

आपण अनेकदा कोकणातून प्रवास करताना रेल्वेवरून ट्रक जाताना पाहिले आहेत? लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच अगदी कुतूहलाने त्याकडे पाहत असतात. पण ती ट्रेन नेमकी कुठून येते? कुठे जाते? हे सगळे प्रश्नच असतात. पण त्याची उत्तर अापल्याला कुणाकडे मिळणार हा दुसरा प्रश्न असतो.
जर अजून तुम्हाला या प्रश्नाची उत्तरे मिळाली नसतील तर तुम्ही हे आर्टिकल जरूर वाचा.
भारतीय रेल्वेवर RORO ही सेवा चालवण्यात येते. या सेवेला Roll On Roll Off service असे म्हटले जाते. भारतीय रेल्वेतर्फे ही सेवा कोकण रेल्वेवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोकणातून दक्षिणेकडे जायचे असल्यास किंवा दक्षिणेतून कोकणात यायचे झाल्यास आपल्याला जवळच्या एकाच मार्गाचा वापर करावा लागतो, तो मार्ग म्हणजे मुंबई-गोवा महामार्ग होय. परंतु हा महामार्ग देशातील काही कठीण आणि खडतर महामार्गांपैकी एक समजला जातो. याचे पहिले कारण म्हणजे या रस्त्याची रुंदी फारच कमी आहे आणि दुसरे कारण म्हणजे हा महामार्ग कोकणातील घाटरस्त्यांमधून काढण्यात आला आहे. त्यामुळे अवजड ट्रक घेऊन प्रवास करणाऱ्या चालकांना या मार्गावर ट्रक चालवण्यात बरीच अडचण येते. विशेषत: पावसाळ्यात तर या महामार्गावरून प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत धरून चालण्यासारखे असते. या अश्या ट्रक चालकांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेने कोकण रेल्वेच्या सहकार्याने २६ जानेवारी १९९९ रोजी RORO सेवेला सुरुवात केली. या सेवेंतर्गत भलेमोठे अवजड ट्रक ट्रेनवर चढवून त्यांना कोकण रेल्वेच्या मार्गाने दक्षिणेत आणले जाते किंवा दक्षिणेतून कोकण रेल्वेच्या मार्गाने कोकणाच्या पलीकडे पोचवले जाते.
कोकण रेल्वेचे हे दोन RORO मार्ग
१) कोलाड ते वेरना- अंतर ४१७ किमी
२) कोलाड ते सुरथकाल- अंतर ७२१ किमी
कोलाड ते वेरना या मार्गावरून ट्रक वाहून नेण्यासाठी ट्रेनला १२ तासांपेक्षा कमी वेळ लागतो, हेच अंतर जर महामार्गाने गाठायचे झाल्यास २२ तास लागतात. दुसरीकडे कोलाड ते सुरथकाल अंतर पार करण्यासाठी ट्रेनला २२ तासांपेक्षा कमी वेळ लागतो आणि हेच अंतर जर महामार्गाने गाठायचे झाल्यास ४० तास लागतात. RORO सेवा ट्रक्सला कोलाड, वेरना आणि सुरथकाल या स्थानकांवर सोडते. तेथून पुढे हे ट्रक्स इच्छीत स्थळी आपला प्रवास पुन्हा रस्ते मार्गाने सुरु करतात.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे RORO सेवा ही रस्त्यावरील वाहतुकीपेक्षा बरीच स्वस्त पडते. तसेच प्रदुषण देखील होत नाही. या सेवेमुळे वर्षाला जवळपास ५० लाख लिटर डीजेलची बचत होते. रस्त्यावर अवजड वाहनांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीला आळा बसतो. अपघातांचे प्रमाण घटते. तसेच तर्क चालकांसाठी चांगली गोष्ट म्हणजे ते त्यांचा माल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेळेत पोहोचवू शकतात. RORO सेवेंतर्गत दिवसाला ३ ट्रेन चालवल्या जातात. प्रत्येक ट्रेनवर ५० ट्रक चढवले जातात. या सेवेमुळे भारतीय रेल्वेला वर्षाला तब्बल ५० करोड रुपये इतके उत्पन्न मिळते.

Loading...
SHARE